पुणे- शिकाऱ्याने लावलेल्या फासात अडकलेल्या मोराला परिसरातील तरुणांनी समयसूचकता दाखवत जीवनदान दिले. हा प्रकार दौंड तालुक्यातील राहू येथील वन विकास महामंडळाच्या हद्दीतील जंगलात घडला. मोरांची संख्या कमी होत असताना तरुणांनी केलेल्या कार्यामुळे या तरुणांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
दौंडमध्ये तरुणांच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वनांचे क्षेत्र असून या परिसरातील बहुसंख्य वन्य प्राणी व पक्षी शिकाऱ्यांचे सावज बनत चालले आहे. मोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असताना मोरांची शिकार करण्याचे गंभीर प्रकार येथे घडताना दिसत आहेत.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वैभव आबने, विकास शिंदे, कैलास शिंदे, बापू शिंदे, अशोक शिंदे हे तरुण नदीवर असेल्या सिंचनाच्या विद्युत मोटारीकडे जात होते. यावेळी त्यांना तेथे शिकाऱ्याने लावलेल्या फासामध्ये मोर अडकल्याचे दिसून आले. मोराचा पाय रक्तबंबाळ झाल्याचे पाहून या तरुणांनी फासातून मोराची सुटका करत त्याला घरी घेऊन आले. चारा पाणी देत वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
वनविभागाचे वन मजूर व्हि. डी. होले याठिकाणी आले. तरुणांनी मोराला त्यांच्या ताब्यात दिले. यवत येथे जखमी मोरावर उपचार करण्यात येत असून त्याच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याचे वनविभागाचे वनपाल एन. सी. चव्हाण यांनी सांगितले.