पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कँटीनमधील जेवणात अळ्या आढळल्याचे समोर आले आहे. मागील ३ दिवसांपासून कँटीनच्या जेवणात सातत्याने अळ्या आढळत आहेत. त्यामुळे अशा निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कँटीनमधील जेवणात आढळल्या अळ्या - विद्यार्थी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कँटीनमधील जेवणात अळ्या आढळल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा कँटीन मालक आणि विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सुरुवातीला जेवणात अळ्या आढळल्यामुळे विद्यार्थ्यांनी कँटीन चालकला जाब विचारला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या कँटीनच्या कंत्राटदाराला ३ दिवस गोड पदार्थ देण्याचा दंड ठोठावला आहे.
या कँटीनमधील अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलने केले. असे असूनसुध्दा निकृष्ट दर्जाचेच जेवण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे जेवणाचा दर्जा नेमका सुधारणार तरी कधी असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठात राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र निकृष्ट जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.