पुणे - नारायणगाव बायपासचे पुणे-नाशिक महामार्गावरील रखडलेले काम शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आज सुरुवात झाल्याने प्रवाशांना लवकरच वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाला सुरुवात - बायपास
गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आज सुरुवात झाल्याने प्रवाशांना लवकरच वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्याच अधिवेशनात नारायणगाव बायपासचे रखडलेले काम पाठपुरावा करून पुन्हा सुरू करुन घेतले. परंतु, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने उद्धाटनासाठी ते स्वतः मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. केवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये आणि वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकर दिलासा मिळावा म्हणून डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करून घ्या, असे सांगितले. डॉ. कोल्हे यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
नारायणगाव बायपासचे काम आज सुरू झाले असले तरी कळंब, मंचर खेड घाट, राजगुरुनगर या ठिकाणचे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी ही नित्याचीच झाली आहे.