जुन्नर(पुणे)-जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 1 गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गावाला कंटेंनमेंट झोन जाहीर केला आहे. मात्र, गावात विनापरवाना प्रवेश करण्यावरुन पोलिसांसोबत झालेल्या वादात शेतकरी महिलेने पोलीस व नागरिकांसमोर विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुजा रोहिदास शिंगोटे, वय 45 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
जुन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या संख्येत ग्रामीण भागात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कंटेंनमेंट झोन करण्यात येत आहेत. ओतुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उंब्रज नं. 1 या गावात पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी कंटेंनमेंट झोन करुन गावात प्रवेश व बाहेर पडण्यास बंदी केली आहे .मात्र, मंगळवारी शिंगोटे कुटुंब टेम्पोतून भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बाहेर पडले होते. सायंकाळच्या सुमारास गावात प्रवेश करत असताना प्रवेश करण्यावरुन पोलीस व शिंगोटे कुटुंबांत वाद झाला. दरम्यान, काहीच वेळात हा वाद विकोपाला जाऊन अनुजा शिंगोटे यांनी गावातील नागरिक व पोलिसांसमोर विषारी औषध प्राशन केले. त्यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.