पुणे - कुष्ठरोग बरा होत नसल्याने पतीचा मुलांच्या आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात घडला. दामोदर तुकाराम फाळके असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अगोदर हा अपघात असल्याचा बनाव करत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तशी तक्रारही देण्यात आली. तळेगाव पोलिसांना संशय आला होता त्यानुसार शवविच्छेदन अहवालात देखील जखमा या अपघाताच्या नसून मारहाणीच्या असल्याचे समोर आले. त्यानुसार पत्नी, दोन मुले आणि प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी दामिनी दामोदर फाळके, प्रियकर राजेश सुरेश कुरूप (वय ४५), वेदांत दामोदर फाळके (वय १८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा -दोन्ही पायांनी दिव्यांग तरीही दुकान फोडले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबरला कुष्ठरोग पीडित दामोदर यांचा अपघात झाला असल्याचा बनाव चार जणांनी रचला होता. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व मयूर वाडकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत हा अपघात नसून तो खून असल्याचे समजले. मयत दामोदर यांचा पत्नी दामिनी आणि राजेश कुरूप यांच्यात गेल्या १२ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. दामोदर यांचा खून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी केला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीआधारे गुन्हे शाखा ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.आरोपी राजेश, मयत यांचा मुलगा वेदांत फाळके आणि त्याचा अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दामिनी फाळके आणि राजेश सुरेश कुरूप यांचे गेल्या १२ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. दामोदर यांना कुष्ठरोग असल्याने तो दामिनी आणि त्यांच्या दोन मुलांना होईल, असे वाटत होते. तसेच दामोदर यांच्या औषधोपचारांकरीता फाळके कुटुंबीय कमावत असलेले पैसे कमी पडत होते. त्यामुळे इतर नातेवाईकांकडून १२ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम देण्याकरता दामोदर हे कोणतीही मदत करत नव्हते. दामोदर यांच्यावर उपचार करून देखील कुष्ठरोग बरा होत नव्हता. त्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
सदरची कारवाई गुन्हे शाखा, युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, फारूक मुल्ला, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, वसीम शेख, दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, धनंजय भोसले, श्यामसुदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, आशा जाधव, नागेश माळी व अतुल लोखंडे यांनी केली.