पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी सुरु आहे. याचा शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असून, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांवरही याचा परिणाम झाला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये संदिग्धता आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, आता शाळा महाविद्यालयांनी ई-लर्निंगच्या विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. पुण्यातील खासगी शाळांमध्ये वेबसेमिनार, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असाईनमेंट देणे त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवल्या जात आहेत. पुणे शहरात अनेक खासगी शाळांनी झूम तसेच गुगल सारख्या माध्यमातून वर्च्युएल क्लास देखील सुरू केले आहेत.
तसेच महाविद्यालयात देखील अशा प्रकारे शिकवायला व्हर्चुअल क्लास घेण्यात येत आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी, एमआयटी, भारती विद्यापीठ, आझम कॅम्पस, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ अशा संस्थेतील विविध शाखांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना झुमॲपद्वारे मार्गदर्शन करुन विविध शाखांमध्ये इयत्तेनुसार व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून तसेच पर्सनल कॉलिंग करुन समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जात आहे. तसेच झूमॲप आणि गुगल क्लासरुमद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सुरु केले आहे. तसेच ई-बालभारतीवरील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने 'लर्न फ्रॉम होम' सुविधा राबवली आहे. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने 'लर्न फ्रॉम होम' संकल्पनेची अंमलबजावणी केली जात आहे. विविध सोशल साईट्स, लर्निंग अप्लिकेशन्स आणि मोबाईलच्या वापरातून नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे.
ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना रोज विविध विषयांच्या नोट्स, प्रात्यक्षिके, असाईनमेंट दिल्या जात आहेत. त्यांचे मूल्यमापन आणि त्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन वैयक्तीक पातळीवर केले जात आहे. आठवड्याचे सबमिशन आणि त्याचा पाठपुरावा केला जातो. सर्व प्राध्यापकांच्या, विभागप्रमुखांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणात सातत्य राहण्यासाठी हा उपक्रम केला जात आहे.