बारामती (पुणे)- आपत्कालिन परिस्थिती व वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तसेच अगदी घटना घडत असताना पीडित व्यक्तींना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
बारामती उपविभागामधील १७० गावांमध्ये ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आत्पकालिन परिस्थितीमध्ये तातडीने मदत व तपासकामामध्ये वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गांवामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्यक्ष संकटकाळात म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मुले हरविणे, महिलांची छेडछाड, वाहनचोरी, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्यप्राणी हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाया नागरिकांशी तात्काळ संपर्क साधून मदत मागवणे ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे शक्य होणार आहे.
ग्रामस्थ आपला मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवल्यानंतर ही यंत्रणा सबंधीत ग्रामस्थांला वापरता येते. या १८००-२७०-३६०० वर नोंदणी केलेल्या ग्रामस्थाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो ग्रामस्थांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाचा माहिती मिळते. त्यामुळे तातडीने पीडित व्यक्तीला मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणा गावात सुरू कशी करावी
प्रत्येक गावामध्ये पोलीस ठाण्याकडून ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित सभा घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्याक्षिक देण्यात येते. ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा गांवामध्ये कार्यान्वित करण्यासंदर्भात प्रति कुटुंब एका वर्षासाठी ५० रुपये एवढा खर्च येणार आहे.