पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Famous actor Ashok Saraf) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, अशी माहिती आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे मुगंटीवार यांनी म्हटलं आहे.
अशोक सराफ यांची 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया आजच्या या पुरस्काराने मला आनंद झाला. राज्य सरकार पद्मश्री पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करत आहे हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. पद्मश्री पुरस्कार नावाची शिफारस करण्यासाठी उशीर झाला का? या प्रश्नावर सराफ म्हणाले, असे काही नाही. आता याबाबत शिफारस केली हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे.
सराफांचा पुरंदरे पुरस्काराने गौरव : बालगंधर्व रंगमंदिरात मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान (Shivshahir Babasaheb Purandare Award) करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. ब. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
सराफ विनोदाचे बादशहा :'अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला. सराफ यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटलं जातं. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचं, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचं कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केलं. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची होती', असं मुनगंटीवार म्हणाले.
महाराजांचा विचार प्रत्येक घरात :'आज बाबासाहेब पुरंदरे जरी नसले, तरी प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्याचे कार्य करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरात पोहोचवला, तर देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही. संशोधकाच्या भूमिकेतून प्रसाद तारे यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पुस्तकरूपानं मांडल्याबद्दल त्यांनी लेखकाचं अभिनंदन देखील केलं'.