पुणे - माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले स्वराभिषेकातून पुणेकरांचे मनोरंजन - पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत इंडियन आयडॉल फेम गायिका नंदिनी व अंगद गायकवाड यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. 'माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सेवा करण्याची संधी मिळाली,' अशा भावना नंदनी गायकवाडने व्यक्त केल्या.
मंदिरात विविध फुलांची सजावट -
श्री गणेशाचा विनायक हा अवतार पृथ्वीतलावर महर्षी कश्यपांच्या घरी झालेला अवतार आहे. हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची महाराष्ट्रभर परंपरा आहे. पहाटे 3 वाजल्यापासूनच दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. फुलांची आणि फुलपाखरांची अत्यंत नयनरम्य सजावट मंदिरात करण्यात आली आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता -
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.