पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण मानवजात आणि समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. युगा-युगांमध्ये अशी एखादी व्यक्तीच जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. लोणी काळभोर परिसरातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिवरायांचे विचार संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी, युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे अयोग्य - शरद पवार - अनावरण
युगा-युगांमध्ये अशी एखादी व्यक्तीच जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, भारतात अनेक राज्ये होऊन गेले, त्यांना त्यांच्या घराण्याने ओळखले जाते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तत्व याची जाण होती. हा शेतकऱ्यांचा राजा होता. शिवाजी महाराज भारतातले, असे एकटे राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. त्यांनी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले होते. धर्मा-धर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.