बारामती- मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणार्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. गणेश लक्ष्मण गायकवाड( वय २५, रा.पाटण सांगवी, ता.आष्टी, जि.बीड) व राजेंद्र उत्तम चांगण( वय ५३, रा.साखरवाडी ता. फलटण,जि. सातारा) असे त्या दोघांची नावे आहेत. मांडूळाला वनविभाच्या ताब्यात देण्यात आले असून त्या दोघांनाही पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान आढळले मांडूळ...
बारामती येथील नक्षत्र गार्डन परिसरात हे दोघेजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळील कापडी पिवशीत मांडूळ जातीचे साप आढळून आले. आपण हे मांडूळ साप विक्रीसाठी आणल्याची कबूली या दोघांनी पोलिसांना दिली.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगूटे, हवालदार जयंत ताकवणे, यांनी ही कामगिरी केली.