महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2022, 8:45 PM IST

ETV Bharat / state

Mukta Tilak Passes Away : आमदार मुक्ता टिळक यांना विविध नेत्यांकडून श्रद्धांजली

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Tributes to MLA Mukta Tilak from various leaders)

Mukta Tilak Passes Away
आमदार मुक्ता टिळक यांना विविध नेत्यांकडून श्रद्धांजली

पुणे :निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या सदैव कार्यमग्न राहिल्या. उत्तम संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाखाणण्याजोगे गुण होते. महापालिकेच्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या, विरोधीपक्षनेते पद आदी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. २०१७ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश मिळाल्यानंतर पक्षाने मुक्ताताईंकडे महापौरपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्याच्या विकासात भरीव योगदान दिले. मुक्ताताईंच्या जाण्याने एका प्रामाणिक कार्यकर्तीला आणि कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधीला मुकलो, असे पालकमंत्री पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


खासदार गिरीश बापट यांच्याकडून श्रद्धांजली :कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार मुक्ताताई शैलेश टिळक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि वेदनादायी आहे. पक्ष संघटनेचा विस्तार, पक्षबांधणी यासह महापौरपदाच्या काळात आणि आता आमदार असताना त्यांनी शहर विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे होते.मुक्ताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! (Tributes to MLA Mukta Tilak from various leaders)



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली :'लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण :पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 1992 पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती. पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

ABOUT THE AUTHOR

...view details