पुणे- गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर होताना दिसून येत आहे. रविवारी (12 मे) झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी तिघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत एका महिलेसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या. गुन्हेगारी कारवायांमध्ये कोयत्यांचा होणारा सर्रास वापर पाहून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील जुना बाजार परिसरातून शंभरहून अधिक कोयते जप्त केले होते. परंतु काल झालेल्या घटनांमध्ये कोयत्यांचा वापर झाल्याने पोलिसांची कारवाई थंडावली की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हडपसर येथील मांजरी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका मासे विक्री करणाऱ्या दाम्पत्यावर दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार केले. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रेणुका दिलीप ढिले यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत त्यांचे पती दिलीप ढिले गंभीर जखमी झाले आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.