पुणे - विभागातील कृष्णा आणि भीमा खोऱ्यापैकी भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कृष्णा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा जोर अद्यापी कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्या दृष्टीने या जिल्ह्यात बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह टेरिटोरियल आर्मीची पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफसह टेरिटोरियल आर्मीची पथके तैनात
पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह टेरिटोरियल आर्मीची पथके तैनात असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. कर्नाटकमधील आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुणे विभागात सरासरीच्या 137 टक्के पाऊस झाला आहे. विभागातील प्रमुख कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून भीमा खोऱ्यातील पावासाचा जोर कमी झाल्यामुळे या भागातील पूरस्थिती नियंत्रणात आहे.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील 1 लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. विभागात जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच बचाव व पुनर्वसन कार्यात नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.