पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातून अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. कामाच्या शोधात पुणे जिल्ह्यात ही माणसे दाखल तर होत आहेत, पण त्यांच्या हाताला काम आणि रहायला जागा मिळत नाही. यामुळे या कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली ही कुटुंबे निर्वासिताचे जगणे जगत आहेत.
स्थलांतरितांच्या वाटेला निर्वासितांचे जगणे...मराठवाड्यातील कुटुंबे भोगतायत पुण्यात उपेक्षा - डोंगर
पोटासाठी स्थलांतरित झालेल्या माणसांना ना काम मिळतेय ना रोजगार..मिळतेय ती फक्त उपेक्षा
मराठवाड्यामधील जालना जिल्ह्यातून आलेली ही आठ - दहा कुटुंबे आंबेगाव तालुक्यामध्ये डोंगराच्या कपारीला वस्ती करून राहू लागली होती. पण, या ठिकाणीही या नागरिकांना राहू दिले गेले नाही. रोजगारही मिळत नसल्याने या कुटुंबांपुढे निवारा आणि अन्नाचा मूलभूत प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे त्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.
निवडणुका तोंडावर आल्यावर मतदानाची भीक मागत राजकीय मंडळी या गोरगरीब कुटुंबीयांकडे जाऊन आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र, प्रत्यक्षात या नागरिकांच्या पदरात काहीच पडत नाही. सरकारच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यांना आर्थिक मदत जाहीर झाली आहे. मात्र, नागरिकांपर्यंत ती पोहोचत नाही का असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. कष्टाची तयारी असतानाही हाताला काम मिळत नाही. त्यामुळे ही कुटुंबे मोठ्या विवंचनेत सापडली आहेत. अशा परिस्थितीत सरकार तरी आपल्या मदतीला येईल, अशी आशा बाळगून ही माणसे बसली आहेत.