पुणे - शिरूर रामलिंग रस्त्यावरील बालाजी एम्पायर येथील तीन बंद बंगल्यांमध्ये चोरी झाली. दरवाजे तोडून व खिडकी गॅस कटरने कापून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. यात चोरट्यांनी एका घरातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर इतर दोन बंगल्यांचे मालक गावाला असल्याने त्याबद्दल माहिती मिळू शकली नसल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले. चिंतेची बाब म्हणजे चोरी झालेल्या तीन घरांमध्ये मुंबई पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्याही बंगल्याचा समावेश आहे.
याबाबत घरकाम करणाऱ्या मनिषा अमर जगदाळे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '1 मे रोजी सकाळी साडेदहा ते 2 मे रोजीच्या सकाळी 6 वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने आमच्या बंद बंगल्याचा अंडरलॉक दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. यानंतर एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच, आमच्या शेजारी राहणारे 20 बी बंगलो प्लॅटमधील राहणारे विनय देशपांडे यांच्या बाजूकडील खिडकी गॅस कटरने उचकटली. त्या पलीकडे राहणारे 21 ए मधील प्रमोद डोंगरे यांच्या बंद घराचाही दरवाजा उचकटून त्यांच्याही घरी चोरी केली. त्यांचा किती ऐवज चोरी गेला आहे याबाबत अद्याप ते घरी नसल्याने माहिती मिळू शकली नाही. तर चोरट्यांनी या तिन्ही घरातील कपाटे व इतर साहित्य उचकटून अस्तव्यस्त फेकले', अशी फिर्याद मनिषा जगदाळे यांनी दिली.