खेड (पुणे) - पारंपरिक पद्धतीने गावठाणाची मोजणी करण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे १८० दिवसांमध्ये राज्यातील पाच हजारांहून अधिक गावठाणांची मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने गावठाणांची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम या खात्याच्या नावावर नोंदविला गेला आहे. त्यामुळे या गावठाणांतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड लवकर उपलब्ध होणार असून, त्यातून गावातील अतिक्रमणे, जमिनीच्या वादासह अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून नवा विक्रम, ड्रोनच्या मदतीनं केली गावठाणांची मोजणी
राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी १५ ते ३० दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या साहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४०० गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी १५ ते ३० दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या साहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
सध्या शासनाने पाच ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर २० ड्रोन उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात कमी पाऊस असलेल्या हवेली, शिरूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांतील गावठाणांची मोजणी हाती घेण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात बारामती, जुन्नर, मावळ, खेड, इंदापूर आणि तिसऱ्या टप्प्यात भोर, वेल्हा, मुळशी आणि आंबेगाव अशा क्रमाने या तालुक्यातील गावठाणांची मोजणी होणार होती. मध्यंतरी राज्य सरकारने सरसकट राज्यातील गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचे आदेश दिले होते. त्यास ऑक्टोबरपासून राज्यात ड्रोनच्या मदतीने मोजणीचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक गावठाणाची मोजणीचे काम पूर्ण झाले असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.
- ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे -
- वेळेची सर्वाधिक बचत
- १५ ते ३० दिवसांचे काम एका दिवसात पूर्ण
- अचूकता अधिक
- खर्चातही ५० टक्के बचत होऊ शकते
- मोजणी झालेल्या गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
- जागेचे वाद मिटण्यास मदत होणार
- मालमत्तेवर कर्ज घेणे सहज शक्य होणार
- ४२ हजार एकूण गावठाण
- ३ हजार आतापर्यंत मोजणी
- ५ हजार ड्रोनद्वारे मोजणी
आतापर्यंत राज्यातील पाच हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी २०८ गावांच्या मिळकतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच त्यांचे वाटप करण्यात येईल. उर्वरित गावठाणाच्या मिळकतपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाबासाहेब काळे यांनी दिली.