महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जानकरांचे पंख छाटले; बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपकडून तिकीट - कांचन कुल

लोकसभेच्या बारामती मतदारसंघासाठी भाजपकडून कांचन कुल मैदानात... राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कुल यांचा रंगणार सामना... कांचन कुल या दौंड विधानसभेचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत....

बारामतीत भाजपकडून कांचन कुल मैदानात

By

Published : Mar 23, 2019, 12:46 PM IST

Updated : Mar 23, 2019, 1:04 PM IST


पुणे- बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी अखेर भाजपला उमेदवार सापडला आहे. भारतीय जनता पक्षाकडून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्या सहयोगी पक्ष रासपचे नेते महादेव जानकर यांचे पंख छाटले आहेत. त्यामुळे आता महादेव जानकर भाजपच्या या खेळीवर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गत निवडणुकीत बारामतीमधून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती.

बारामतीत भाजपकडून कांचन कुल मैदानात

दौंडचे कुल घराणे हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. राहुल यांच्या मातोश्री रंजना कुल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौंडमधून आमदार राहिलेल्या आहेत. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी रमेश थोरात यांच्या बाजूने झुकत माप दिल्याने २०१४ च्या निवडणुकीत राहुल कुल यांनी महाआघाडीतील रासप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी दौंडची उमेदवारी मिळवून ते आमदार म्हणून निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नी कांचन यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. त्यामुळे बारामती मतदार संघातील निवडणुकीला रंग चढणार आहे.

कांचन कुल यांचे माहेर हे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या चुलत आत्या लागतात. त्यामुळे एकंदरीत या उमेदवारीमुळे नात्यागोत्याचे राजकारणदेखील करण्यात आल्याचे दिसून येत आहे. २०१४ ला बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महाआघाडीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शड्डू ठोकला होता. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. त्यामुळे जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. आता राहुल कुल हे रासपचे आमदार असल्याने धनगर समाजाच्या मतदानचा फायदा कांचन कुल यांना होऊ शकतो, असा कयास या उमेदवारी मागे असण्याची शक्यता आहे.

२०१४ लोकसभा निवडणूक वगळता बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपला सक्षम उमेदवार देता आलेला नव्हता. मात्र, आता कांचन कुल यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने या निवडणुकीत आव्हान निर्माण करण्यात आले, यात शंका नाही. दरम्यान, कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दौंड शहरात स्कूल समर्थकांनी फटाके वाजवून या उमेदवारीचे स्वागत केला आहे. यंदा बारामती जिंकायचीच असा निर्धार मुख्यमंत्र्याकडून सातत्याने व्यक्त केला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही पुण्यात झालेल्या पक्ष मेळाव्यात बारामतीसह राज्यातल्या ४८ जागा जिंकायच्या, असा आवाज कार्यकर्त्यांना दिला होता. त्यामुळे बारामतीतून भाजप कोणाला मैदानात उरवणार याची उत्सुकता होती, त्याचे उत्तर आता मिळाले आहे. मात्र, बारामती सर करण्याचा भाजपचा मानस पूर्ण होणार का? याचे उत्तर २३ मे लाच मिळेल.

Last Updated : Mar 23, 2019, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details