पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीत लहान मोठ्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना टाळेबंदीनंतर शून्यातून सुरु करावे लागणार आहे. मुंबईनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका पुण्याला बसला आहे. यामुळे पुण्यात अमृततुल्य, अशी ओळख असलेल्या चहा व्यवसायिकांना मोठा फटका बसला असून लहान व्यवसायिकांचा व्यवसाय जणू संतुष्टात आला आहे.
अमृततुल्यचा विचार केला तर पुणे शहरातल्या या हजार बाराशे अमृततुल्य दुकानांमध्ये मालका शिवाय किमान 2 तर कमाल 6 कामगार आहेत. हे कामगार 10 ते 15 वर्षापासून त्यांच्या सोबत काम करत आहेत. त्यामुळे एकीकडे संपूर्ण व्यवसाय ठप्प असताना या कामगारांना आठवड्याला काही हजार रुपये मालकांना द्यावे लागत आहेत. या व्यवसायावर 7 ते 8 हजार कुटुंब अवलंबून आहेत. आता लॉकडाऊन जेव्हा उघडेल तेव्हा आम्हाला पुन्हा शून्यातून व्यवसाय उभारावा लागेल, असे अमृततुल्य व्यवसायिकांचे म्हणणे आहे.