पुणे- लोकसभा मतदारसंघ उमेदवारीसाठी अजूनही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार, अशी जोरदार चर्चा सध्या पुण्यात आहे. अरविंद शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. मात्र अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण दिसून येत आहे, पक्ष नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असतानाच आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसकडून सुरेखा पुणेकरांना उमेदवारी? पुण्यात बापट-पुणेकर सामना रंगणार..
पक्ष नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असतानाच आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे
सुरेखा पुणेकर यांनादेखील काँग्रेसकडून उमेदवारी बाबत विचारणा करण्यात आली होती. त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस वरिष्ठांच्या भेटी देखील घेतल्या असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्याचे आपले प्रयत्न आहेत. या निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे काँग्रेस श्रेष्ठींना देखील कळवले असल्याचे पुणेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून विचारणा झालेली होती मात्र अद्याप उमेदवारीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अजून तरी काँग्रेसकडून अधिकृत रित्या काहीही सांगण्यात आलं नाही, मात्र आपण तयार असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
एकंदरीतच पुणे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराच्या बाबतचा तिडा आणखीच वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळात समोर आलेल्या नावांपैकी प्रवीण गायकवाड यांनी आपण उमेदवारीसाठी आता इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. तर काँग्रेसमधील इच्छुकांपैकी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांची नावे मागे पडली असताना गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे अनौपचारिकरीत्या सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा असताना देखील अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून काही वेगळा पत्ता खेळला जातो का? अशी चर्चा सुरू असतानाच आता सुरेखा पुणेकर देखील काँग्रेस इच्छुकांमध्ये असल्याचे समोर आले आहे.