पुणे- शिरुर तालुक्यातील कवठेयमाई गावातील माळरानावर करणी, जादुटोणा आणि अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याठिकाणी ३ बोकडांचे शीर कापुन बळी देण्यात आला आहे. शिवाय त्याबाजुने लिंबांची माळ करून काळ्या कपड्यासह पुरुष व महिलांचे नवीन कपडे ठेवुन ही पुजा केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शिरुर तालुक्यातील कवठेयमाई येथे ३ बोकडांचा बळी देऊन हा प्रकार केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या यांनी गावात येऊन याबद्दल सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांनी भिण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले.
शिरुरमध्ये ३ बकरांचा बळी देऊन 'करणी' मागील ६ महिन्यापूर्वी शिरुर तालुक्यातील मलठण येथे असाच जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना आज पुन्हा अशी भयानक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही अशा अंधश्रद्धेच्या भयानक घटना घडतातच कशा असाही प्रश्न समोर येत आहे. मात्र, अशा भयानक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या विज्ञानयुगात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. तर, दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. त्यामुळे असले प्रकार करणाऱ्यांचे फोफावत चालले आहे.
समाजात गेल्या अनेक दिवसांपासुन साधु, देवऋृषी असे अनेकजण अघोरी विद्येची खिरापत देत गावोगावी फिरत आहेत. हे लोक नागरिकांमधील अज्ञान पाहुन पैशासाठी अंधश्रद्धा पसरवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भितीच्या छायेखाली आपले जीवन जगत आहेत.