पुणे - राज्य मंडळाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटर्नल मार्कही ग्राह्य धरावेत, अशी मागणी आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदा मोठी घट झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेकडून दिले जाणारे 20 गुण यावर्षी देण्यात आले नाहीत, त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणात घट झाली आहे, तर सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना 20 गुण मिळाल्याने त्यांचे गुण वाढले आहेत.
अशा परिस्थितीत अकरावी प्रवेश प्रक्रियेत आमच्यावर अन्याय होईल, अशी भूमिका घेत राज्य मंडळाच्या विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणमंत्र्याकडे 20 गुण ग्राह धरण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया घेताना लेखी परीक्षेचे 80 टक्के गुण ग्राह्य धरले जाण्याबाबत विचार सुरू असल्याने आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पालकांनीही एकत्र येत, असे न करण्याबाबत शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयत्यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे. नवे सूत्र अन्यायकारक आहे, अशी भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली आहे.