मुंबई -शरद पवार महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातले वलयांकीत नाव आहे. 52 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची तिसरी पिढीही आता राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. रोहित पवार तिसऱ्या पीढीतील चर्चीत नाव आहे. कमी कालावधीत आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक रोहित यांनी दाखवून दिली आहे.
पवारांचे संभाव्य राजकीय वारस:
अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पवार कुटुंबातील दुसऱ्या पीढीने राजकारणात आपली नेतृत्व क्षमता सिध्द केली आहे. त्यानंतर हा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार याबाबत प्रामुख्याने पार्थ आणि रोहीत पवार यांच्या नावाची चर्चा होते.
रोहित हे अजित पवार यांचे चुलत भाऊ राजेद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी शरद पवारांचे नातू या पुरतीच आपली ओळख मर्यादित ठेवली नाही. एक उद्योजक, शेतीची उत्तम जाण असणारा लोकप्रतिनीधी म्हणून रोहित यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. 'इंडियन शुगर मिल्स असोसिएशन'चे अध्यक्ष आहेत. असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष असण्याचा मानही रोहित यांना मिळाला आहे.
शिक्षण :
रोहित यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 12 वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून 2007 मध्ये व्यवस्थापन शास्त्र विषयात पदवी संपादन केली.