पुणे - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. ही मूर्ती स्वयंभू असल्याने 'एक गाव एक गणपती'ची स्थापना केली जाते. भाद्रपद गणेशोत्सवात सुरुवातीचे पाच दिवस मुक्तद्वार दर्शन व जलाभिषेक केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे रांजणगाव गणपतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सव परंपरेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थित यंदाचा सोहळा पार पडण्यात येतोय.
अष्टविनायक महागणपतीच्या मंदिरात भाद्रपद गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरो होतो. पारंपरिक पद्धतीने पार पडणाऱ्या या सोहळ्यात दरवर्षी भाविकांची गर्दी होते. कीर्तने-भजनं व अन्तय धार्मिक अधिष्ठान करण्यात येते. मात्र यंदा उत्सवाचा जोर ओसरला आहे.
माधवराव पेशव्यांनी साकारले पेशवेकालीन बांधकाम
रांजणगावचा महागणपती अष्टविनायकांपैकी चौथा गणपती मानला जातो. या गणपतीला महागणपती म्हणून संबोधण्यात येते. या गणपतीचे स्वयंभू स्थान नगर-पुणे महामार्गावर शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे. या महागणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे भाद्रपद महिन्यात घरोघरी गणेशाची स्थापना न करता 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना रांजणगाव महागणपती पाहायला मिळते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीने करण्यात आले आहे. रांजणगाव महागणपतीचा जीर्णोद्धार माधवराव पेशव्यांच्या काळात करण्यात आल्याच्या इतिहासात नोंदी आढळतात. मंदिराचे स्थान इसवीसन दहाव्या शतकातील आहे. हे संपूर्ण क्षेत्र भगवान शंकरांनी प्रस्थापित केले असून गणेश मूर्तीची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते.