दौंड - सध्या अनेक ठिकाणी शेतात बिबट्या आणि इतर वन्यजीव येत असल्याचा घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतात असे वन्यजीव आल्यास त्यांना कोणतीही इजा न होता पळवून लावण्यासाठी एका बंदूकीचे जुगाड केले आहे. पीव्हीसी पाईप पासून बनवलेली बंदूक विक्रीसाठी दौंड तालुक्यात आली आहे. कार्पेट आणि गॅस लायटरच्या साह्याने पाईपमध्ये स्फोट होऊन मोठा आवाज होतो. यामुळे फटाके न वाजवता शेतातील वन्यजीव पळवून लावता येतात. या पाईपच्या बंदूका अनेक ठिकाणी रस्त्यावर विक्रीसाठी आल्या आहेत.
वन्यजीव पळवून लावण्यासाठी फटाके-दौंड तालुक्यातील अनेक गावांत वारंवार शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. काही ठिकाणी पाळीव जनावरे, शेळ्या - मेंढ्या पाळीव कुत्रे यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. तसेच माणसांवर देखील बिबट्याने हल्ला केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बिबट्या पळवून लावण्यासाठी शेतात फटाके वाजवून मोठा आवाज करतात. शेतात फटाके वाजवणे हे जास्त खर्चिक असते. तसेच फटाक्यांमुळे शेतात आग लागण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सध्या दौंड तालुक्यात पीव्हीसी पाईप पासून बनवलेली बंदूक विक्रीसाठी आली आहे.
कसा होतो आवाज-पीव्हीसी पाईप पासून बनवलेल्या या बंदूकीत कार्पेटचा दगड आणि त्यावर पाणी टाकले जाते. बंदूकीचे तोंड पाईपच्या एका आवरणाने झाकले जाते. काही वेळ ही बंदूक हाताने हलवली जाते. त्यानंतर त्यातील कार्पेटचा दगड बंदूक उलटी करून खाली टाकुन देतात. बंदूकीचे तोंड आकाशाच्या दिशेने करून बंदूकीच्या पाठीमागे असलेला गॅस लाइटर दाबला की मोठा आवाज होतो.
बंदूकीचा फायदा-पाईप पासून बनवलेल्या या बंदुकीतुन मोठा आवाज होत असल्याने वन्यजीव आणि पक्षी पळवून लावता येतात. तसेच वन्यजीव आणि पक्ष्यांना कोणत्याही प्रकारे इजा होत नाही. या बंदुकीचा फायदा शेतकऱ्यांना होतो, अशी माहिती विक्रेत्यांने दिली. ज्वारी आणि इतर पिकांची पक्ष्यांपासून राखण करण्यासाठी शेतकरी आवाज करणारे ढोल, हलगी, गोफण यांचा वापर करत असतात. अशावेळी ही बंदूक पिके राखण्यासाठी उपयोगी पडू शकते.
२०० रुपयांना मिळते तोफ-सध्या अनेक ठिकाणी चौक आणि रस्त्यावर अशा पीव्हीसी पाईप पासून बनवलेल्या बंदूक विक्रीसाठी आल्या आहेत. देशी जुगाड असलेल्या या बंदुकची किंमत अवघी २०० रुपये आहे, अशी माहिती विक्रेते भाऊसाहेब लालचंद जाधव यांनी दिली.ही पाईप पासून बनवलेली बंदूक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे रानडुक्कर, पक्षी , वन्यजीव आणि पिकांवर येणाऱ्या धाडी पळवून लावता येतात, अशी माहिती पीव्हीसी पाईपची बंदूक पाटस येथे विक्रीसाठी घेऊन आलेले भाऊसाहेब लालचंद जाधव यांनी दिली .
हेही वाचा-उद्धव ठाकरेंवर भाजपची नाराजी; मनातला द्वेष लपवता येईल का?