बारामती (पुणे) -टाळेबंदीच्या काळात सर्वकाही ठप्प होते. मात्र, त्याच वेळी बारामतीतील इंजीनियरिंगचे चार विद्यार्थी प्रदूषणमुक्त सौर उर्जेवर चालणारी कार ( Solar Car ) बनविण्यात व्यस्त होते. आज हे सर्वसामान्यांना परवडणारे चारचाकी वाहन रस्त्यावर धावण्यास सज्ज झाले आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष अहवाल.
आज जगभरात वायु प्रदूषणना बरोबरच इंधन दरवाढीची समस्या भेडसावत आहे. अशावेळी बारामतीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त चारचाकी वाहनाची निर्मिती केली आहे. हे वाहन 70 ते 80 हजार रुपयांत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
ललित मोहिते, पियूरा उगले, अभिषेक शेळके, मिनेश गवळे या विद्यार्थ्यांनी या वाहनाची निर्मिती केली आहे. सध्या वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. मात्र, यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पना या विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सेल्फ चार्ज व्हेईकल ( Self Charge Vehicle ) बनवण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी सौर उर्जेवर चालणाऱ्य वाहनांची निर्मिती केली. या वाहनाच्या निर्मितीबद्दल विद्यार्थी सांगतात की, सध्या बाजारात वायुप्रदूषण रोखण्यासाठी बरीच वाहने उपलब्ध आहेत यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पना आम्हाला सुचली. त्यानुसार सौर उर्जेवर धावणारे चारचाकी वाहन बनवले.