पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोविशिल्ड लसीची ऑर्डर मिळाल्यानंतर या लसींची वाहतूक करण्यासाठी पुण्यातल्या आकुर्डी येथे सज्ज असलेले कोल्डस्टोरेज कंटेनर हे हडपसर येथे असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडे रवाना झाले होते. पोलिस बंदोबस्तात हे सहा कोल्डस्टोरेज कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. हे कंटेनर देशभरात पाठवले जाणार आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचे पाच कोटी डोस तयार आहे. यासोबतच, पुढील डोसेसचे उत्पादनदेखील सुरू झाले आहे. आता या लसी घेऊन जाणारे कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून कधी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गरज पडल्यास ट्रकची संख्या वाढवणार -
देशभरात लस पोहचवण्याचे मोठे आव्हान वितरकांवर असणार आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूटवरून विमानतळ आणि पुढे त्या-त्या राज्यातील संबंधित विमानतळावरून कोल्ड स्टोरेज डेपोपर्यंत लस पोहचवण्याची जबाबदारी या कंपन्याना पार पाडावी लागणार आहे. यासाठी 300 कोल्ड ट्रक सज्ज करण्यात आले आहेत. मात्र, गरज लागल्यास आणखी 200 ट्रक उपलब्ध करून देण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे.