पुणे - देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. या तिसऱ्या टप्प्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमधील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून या नागरिकांना 'श्रमिक स्पेशल' रेल्वेने सोडण्यात येणार आहे.
पुण्याहून मध्य प्रदेशात जाण्यासाठी 'श्रमिक स्पेशल' रेल्वे, हजाराहून अधिक नागरिक स्वगृही
देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमधील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून या नागरिकांना 'श्रमिक स्पेशल' रेल्वेने सोडण्यात येणार आहे.
पुणे विभागातील उरुळी कांचन रेल्वे स्थानकावरून मध्य प्रदेशरातील रेवा जिल्ह्यात रेल्वे रवाना झाली आहे. यामध्ये 1 हजार 98 प्रवासी या गाडीने आपल्याला गावी रवाना झाले. रांजणगाव एमआयडीसीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे हे कामगार लॉकडाऊन लागू झाल्यापासून घरीच बसून होते. जवळचा पैसा संपल्याने 2 वेळेसचे अन्न मिळणेही कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थितीत मागचा-पुढचा विचार न करता यातील काही लोकांनी पायीच गावाचा रस्ता धरला होता. परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना अडवून एका ठिकाणी त्यांची राहण्याची, खाण्याची सोय केली होती. त्यानंतर गावी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आणखी काही लोकांची यादी गोळा केली होती. आज (गुरुवार) या कामगारांना श्रमिक स्पेशल रेल्वेने स्वतःच्या गावी रवाना केले.
दरम्यान, या लोकांना रवाना करण्यापूर्वी जिल्हाधिकारी प्रशासनाने मध्य प्रदेश सरकारशी चर्चा केली. या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली. रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग ठेवत त्यांना सीट क्रमांक देण्यात आला. त्यांना जेवणाची पाकिटे देण्यात आली आणि त्यानंतरच ही ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली. दरम्यान, गावी जाण्यासाठी सुरुवातीला अनेक मजुरांनी नोंदणी केली होती. परंतू, आता लॉकडाऊन संपत आल्यामुळे यातील काही नागरिकांनी गावी जाण्याचा निर्णय रद्द केला.