पुणे(आंबेगाव) - कोरोनाची दुसरी लाट येत असताना राज्यातील रक्तपेढीमध्ये वेगवेगळ्या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला रक्तदान करणे शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.
कोरोनानंतरही धोका कायम
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनानंतरही धोका कायम असतो, त्यामुळे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंत्री वळसे-पाटील यांनी केले आहे.