बारामती- जिल्हाधिकार्यांनी सोमवारी अचानक सर्वच आस्थापना ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज बारामतीत प्रशासनाच्यावतीने सर्वच दुकाने बंद करण्यास सांगितले. अनपेक्षितपणे दुकाने बंद करण्यास सांगितल्यावरून व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे आज बारामतीतील सर्वच आस्थापना सकाळी ९ नंतर सुरू होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीत काढलेल्या आदेशावरून आज प्रशासनाने बारामतीतील सर्वत्र आस्थापना ३० एप्रिलपर्यंत तात्काळ बंद ठेवण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बारामतीत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील व शनिवार रविवार पूर्णतः बंद राहतील, असा आदेश दिला होता. मात्र आज अचानक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच अस्थापन पूर्णतः बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर बारामतीत नाराजी व्यक्त केली जात आहे.
व्यापारी महासंघाचा तीव्र विरोध..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिले ५ दिवस ९ ते ६ दुकाने सुरू ठेवून शनिवार रविवार पूर्णतः दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला आमची सहमती आहे. मात्र ३० एप्रिल पर्यंत दुकाने बंद ठेवण्याला बारामती व्यापारी महासंघाचा तीव्र विरोध आहे. आधीच व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. बारामती शहर व तालुक्यात जवळपास आठ ते दहा हजार व्यापारी असून त्यांच्याकडे ३० ते ३५ हजार कामगार आहेत. जवळपास लाखभर लोकांचा उदरनिर्वाह व्यापाऱ्यांवर अवलंबून आहे. तो यामुळे पूर्णपणे मोडकळीस निघेल याबाबत राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. सलग पूर्णतः लॉक डाउन करण्यापेक्षा चार चार दिवसांचा टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यास हरकत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या या लॉकडाऊनला आमचा तीव्र विरोध असल्याचे बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी सांगितले.
बारामतीत पुन्हा टाळेबंदीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध.. वाढत्या रुग्णसंख्यामुळे घेतला निर्णय..
महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बारामतीत ही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिल पर्यंत टाळे बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र याला बारामतीतील व्यापाऱ्यांचा विरोध आहे.
हेही वाचा -शेजारील राज्यातूनही रुग्ण येत असल्याने नागपुरात बेड मिळण्यास अडचणी