पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा आज सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवरून प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीला अभिषेक केला. त्यानंतर शिवजन्मस्थानास अभिवादन करून शिवकुंज येथील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया शिवसेना आणि भाजपच्या यात्रांमध्ये कुणी ना कुणी मुख्यमंत्री पदावर दावा करतंय. पण शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काढलेली यात्रा आहे. आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री शिवजन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरीवर यायचे आणि किल्याच्या खाली आले की मावळ्यांना भेटायचे. पण, मागील पाच वर्षांत ते कधी खाली आलेच नाहीत. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा असेल आणि पुन्हा मावळ्यांना भेटायला खाली येईल, असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
भाजपने काढलेली यात्रा महाजनादेश यात्रा नाही तर महाधनादेश यात्रा आहे, अशा शब्दांमध्ये भाजपची धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली. तर, शिवसेनेच्या जनाशीर्वाद यात्रा ज्यांना आज आशीर्वाद घ्यायची गरज वाटते अशांसाठी असल्याची टीकाही मुंडे यांनी केली. या महाराष्ट्रात गेली पाच वर्षे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी सर्वात आधी शिवछत्रपतींचा अपमान केला. देशाच्या पंतप्रधानांनी स्मारकाचं भूमीपूजन करूनही त्याची एक वीटही उभी केली नाही. शिवछत्रपतींच्या नावाने जी कर्जमाफी या सरकारने आणली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. त्यातही त्यांनी शेतक-यांना फसवलं. लाखो बेरोजगार तरुणांना महाभरतीच्या नावाखाली फसवले. आणि खरी महाभरती ते त्यांच्या पक्षातली करतायेत. शासकीय पदांची महाभरती ते करत नाहीत. असा टोलाही मुंडे यांनी लगावला.
भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली आहे. सत्तेची मस्तीच आज या लोकांना राजकीय भ्रष्टाचार करायला लावतेय. या राज्यात राज्यकर्ते म्हणून कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही. त्यामुळे, शिवसेना-भाजपने राजकीय भ्रष्टाचार सुरू केला असला, तरी या निवडणुकीत जनता या लोकांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांत शिवनेरीवरुन निघालेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवातीलाच मुंडे यांनी सरकारला झोडपले आहे.