पुणे : प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडी सोबतच्या आपल्या मैत्रीवर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. त्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. प्रकाश आंबेडकर यांना औरंगजेबाच्या थडग्यांवर जायची सवय आहे. ते पूर्वी सुध्दा बऱ्याच वेळा तेथे गेले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'भविष्यात जनता उत्तर देईल' : नीलम गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, शिवसेनेचे प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये बरेच चढ - उतार आले. अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले, अनेकांनी नवीन पक्ष काढले, पण शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आता जे घडले त्याचे उत्तर भविष्यात जनताच देईल, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
मनीषा कायंदे यांच्यावर बोलणे टाळले : नीलम गोऱ्हे यांनी मात्र यावेळी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर बोलणे टाळले. कायंदे यांनी काल शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसैनिकांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की, 'बाळासाहेबांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा विचार मांडला होता. शिवसैनिकांनी 80 टक्के समाजकारणावर भर दिल्यास 20 टक्के राजकारणात पूर्वीप्रमाणेच यश मिळेल.'
'व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद मांडा' : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगू शकतो. यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'या संदर्भात पक्षाचे गटनेते निर्णय घेतात. मी यावर भाष्य करू शकत नाही. माझं पद घटनात्मक आहे. पिठासीन अधिकारी म्हणून माझी भूमिका न्यायपालिकेसारखी आहे. माझ्या काही मर्यादा आहेत'. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, असा आरोप केला आहे. यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कुणी कुणाला शंभर टक्के वेळ देऊ शकत नाही. व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद मांडा. बऱ्याच वेळेला लोक सोयीनुसार वैयक्तिक टीका करत असतात, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली.
हेही वाचा :
- Aurangzeb controversy : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला वाहली फुले, नव्या वादाला फोडले तोंड
- Aurangzeb Controversy : औरंगजेबावरुन का होतोय राज्यात वाद?; वाचा सविस्तर