पुणे -राज्य सरकारमधील सर्व मंत्री जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करून चांगल्या पध्दतीने कामकाज करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच समाजाच्या समृद्धीसाठी स्री शिक्षणाची दालने समृद्ध केली पाहिजेत, असे मतही पवारांनी व्यक्त केले. बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने बांधण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री, पुण्यश्लोक अहिल्याबाई या तीन वसतिगृहांच्या उद्घाटन आणि नामकरण कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार बोलत होते.
हेही वाचा -गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवार भेट; 'कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करणार प्रयत्न'
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, माळेगाव कारखान्याच्या सभासदांमुळे एवढे मोठे शैक्षणिक दालन उभे राहिले आहे. शिकलेल्या महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सैन्य दलात प्रथम महिलांच्या समावेशाचा निर्णय घेतला. राजकीय क्षेत्रात देखील उच्च शिक्षीत महिला कर्तृत्व गाजवत आहेत. तर देशातील विमानाचे होणारे अपघात महिला वैमानिकांमुळे कमी झाले आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती सुखावणारी असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा -राजू शेट्टींनी कर्जमाफीवरून अजित पवारांना 'त्या' विधानाची करून दिली आठवण
शरद पवार यांनी महिला धोरण राबविल्यामुळेच महिला प्रगतीच्या शिखरावर आहेत. मी शिक्षण मंत्री असताना दहावी आणि बारावीच्या निकालात नेहमी मुलीच वरचढ असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी देशमुख यांनी पवारांची भेट घेऊन दिलेली जबाबदारी चोख पाडण्याचे वचन दिले. देशमुख भाषण करून त्यांचा चष्मा डायसवर विसरले. यावर कोटी करताना पवार यांनी गृहमंत्र्याची नजर सर्वत्र असली पाहिजे, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.
हेही वाचा -महाराष्ट्र केसरी: गतविजेता बाला रफिक शेखसह अभिजित कटकेचे आव्हान संपुष्टात
दरम्यान, माळेगाव कारखान्याची निवडणूक होत असल्याने खा. शरद पवार काय बोलणार याकडे संपूर्ण सभासदांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी एकही शब्द काढला नसल्याने सभासदांचा हिरमोड झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची अनुपस्थितील चर्चेचा विषय होती. यावेळी नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख, विश्वस्त, संचालक, सभासद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.