पुणेSharad Pawar INDIA Alliance : शनिवारी (13 जानेवारी) विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आघाडीचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यांनी याला नकार दिला.
आघाडीचं नेतृत्व खरगेंकडे : इंडिया आघाडीच्या या आभासी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. "इंडिया आघाडीची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आम्ही सर्वजण जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेऊ. यावर चर्चा झाली आहे. आघाडीचं नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांनी करावं, असं काहींनी सुचवलं होतं. सर्वांनी ते मान्य केलं आहे", असं शरद पवार यांनी सांगितलं.
योजना आखण्यासाठी समितीची स्थापना : "आगामी काळात योजना आखण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. नितीश कुमार यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी घ्यावी, असं सर्वांनी सुचवलं होतं. मात्र जे आधीपासून प्रभारी आहेत त्यांनी आपलं काम चालू ठेवावं असं त्यांचं मत आहे", असं शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबतही भाष्य केलं. "निवडणुकीनंतर बहुमत मिळालं तर देशाला एक चांगला पर्याय देऊ", असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया : इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही प्रतिक्रिया समोर आली. जागा वाटपाची चर्चा सकारात्मक मार्गानं सुरू असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांनी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना 'भारत जोडो न्याय यात्रेत' सामील होण्यासाठी आमंत्रित केलं असल्याचं सांगितलं.
हे वाचलंत का :
- मल्लिकार्जुन खरगे 'इंडिया' आघाडीचे समन्वयक, नितीश कुमारांची माघार