पुणे : बालेवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीची मुहुर्तमेढ १९९४ साली रोवली. त्या ठिकाणाहून येता जाता अस्वस्थ होते. ऐवढे मोठे स्टेडियम असूनही सर्वसामान्य घरातील खेळाडूला सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अर्थकारण मोठे झाले असून ही परिस्थिती बदलणे गरजेची असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंशी चर्चा करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहनही त्यांनी केले. अनेक खेळाडू मोठे होताना पाहिले असून खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ खेळाडूंच्या मेळावा आणि सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार रविंद्र धंगेकर, खासदार अॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपक मानकर, काका पवार, यांसह शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोख बंदोबस्त :कसबा पेठ विधानसभा मतदार संघात प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक व नाका तपासणी पथकामार्फत आतापर्यंत १० हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. प्रशासनामार्फत मतदार संघात ९ तपासणी नाके तसेच ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भरारी पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. पोलिस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य मिळत आहे. १२ हजार २५० रूपये किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीचे निरीक्षण निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार : कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. अश्यातच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जर आम्हाला माहीत असते की, भाजप खासदार गिरीश बापट यांचे अश्या परिस्थितीत प्रचारात वापर करणार असेल तर आम्ही आमचा उमेदवार दिला नसता, असे यावेळी लोंढे यांनी सांगितले आहे.
प्रचारार्थ रॅलीचे आयोजन :कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, काँगेस प्रवक्ते अतुल लोंढे हे देखील उपस्थित होते. यावेळी या रॅलीला सुरुवात बागवे कमान, महात्मा फुले वाडा, माँसे अळी, चांदतारा चौक-जोहरा कॉम्प्लेक्सअशी झाली. भाजप प्रचारात गुंडांना आणत आहे. यावर अतुल लोंढे म्हणाले की, मोक्काच्या गुंडांबरोबर पोलिसांच्या बैठका कश्या होतात.