पुणे :विदर्भ वगळता आजपासून राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या थाटात करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन तसेच विविध संदेश हातात घेऊन पुस्तकांची दिंडी काढत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे स्वागत :उन्हाळ्याच्या सुटीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा शाळांचा परिसर गजबजणार आहे. दरवर्षी राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरू होत असते. मात्र यावर्षी राज्यातील शाळा या 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या तरी विदर्भातील शाळांना अजून सुट्ट्या आहे. विदर्भातील शाळा या येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांमधील वर्ग खोल्याची स्वच्छता, साफसफाई करण्यात आली. यावेळी राजीव गांधी ई लर्निग स्कूलमध्ये मुलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यावेळी मुलांनीदेखील विविध नेतेमंडळींची नक्कल करत शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला.