पुणे : कसब्यातही युती अभेद्यच राहणार. ही जागा भाजपाच लढेल आम्ही त्यांना पाठिंबा देणार असून शिंदे गट आणि भाजपची युती असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवारी) विरोधी पक्ष नेते अजित पवारसुद्धा बैठक घेत आहेत. विविध पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. परंतु यामध्ये कुठेही शिंदे गट इच्छुकांच्या यादीत नाहीत. आम्ही भाजपला पाठिंबा देऊन ती जागा भाजपसह लढू, असे दीपक केसकर यांनी आज पुण्यात सांगितले आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेसुद्धा केसरकर यावेळी म्हणाले आहेत.
बोगस शाळांवर होणार कारवाई :पुण्यातील बोगस इंग्रजी शाळेविषयी बोलताना बोगस एनओसी शाळेबाबत कारवाई सुरू आहे. कोणी दोषी आढळले तर नक्कीच कारवाई होईल. पण, शाळा बंद होणार नाहीत. मुलांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. दलालांवरही कारवाई होणार आहे. आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. बोगस एनओसीचा प्रकार थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे सुद्धा मंत्री केसरकर म्हणाले.
सत्यजीत तांबेंच्या विजयाची ग्वाही :नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर सत्यजीत तांबे अपक्ष असले तरी 100 टक्के निवडून येतील, अशी अपेक्षासुद्धा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. शिंदे गटात येण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याची शक्यता आहे. आव्हाडांचे आरोप खोटे आहेत. आता त्यांना अटकेची भीती वाटते. त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर मग कशाला घाबरतात, अशी ही प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.