पुणे- पंडित उपेंद्र भट, पंडित अजय चक्रवर्ती या ज्येष्ठ गायकांच्या सुरेल कलाविष्काराने ‘६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची रविवारी सांगता झाली.
पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारुबिहाग मध्ये सुरुवात करून ‘रसिया आवोना...’ ही रचना सादर केली. त्यानंतर ‘नैना लागये सो मेंने..’, ‘कोयलिया बोले चले जात...’ या रचना सादर केल्या. त्यानंतर ‘रम्या ही स्वर्गाहुनी लंका...’ हे नाट्यपद सादर केले. पु. ल. देशपांडे, गदिमा व पंडित भीमसेन जोशी या त्रिवेणीची आठवण करून देत ‘इंद्रायणी काठी...’ हा अभंग पेश केला. त्यांना सचिन पावगी (तबला), कुमार करंदीकर(हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), देवव्रत भातखंडे, तेजस देवडे, धनंजय भाटे, नागेंद्र पांचाळ (तानपुरा व गायन साथ) यांनी साथसंगत दिली.
'६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सुरेल सांगता त्यानंतर पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे गायन झाले. त्यांनी राग भुपालीने गायनाची सुरुवात केली. 'मी संगीताचा व रसिकांचा चाकर आहे. या मंचावर येऊन मला खूप आनंद होत आहे. मी पतियाळा घराण्याचा असलो तरी किराणा घराण्याचे संगीत हे अत्यंत शास्त्रीय व तुमचा पाया पक्का करणारे असल्याने जवळपास सगळेच पहिले यांची गायनशैली शिकतात. त्या अनुषंगाने मी गुरू पंडित भीमसेन जोशी यांना प्रथम मनापासून अभिवादन करतो. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्यानंतर त्यांनी द्रुतलय तीनतील ‘महादेव देव महेश...’ ही रचना त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित केली. तराणा सादर केला. आपल्या देशाचे संगीत एवढे उच्च आहे की तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी शाळेत संगीत हा आवश्यक विषय ठेवायला हवे, असेही त्यांनी सांगितले व राग किरवणी मधील ‘बसों मेरे नैनन में नंदलाल...’ या भजनाने मैफलीची सांगता केली. त्यांना सत्यजित तळवलकर (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम), मेहेर परळीकर, अमोद निसाळ (तानपुरा) यांनी साथसंगत दिली.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने संगीतोत्सवाची सांगता होते. मात्र, यंदा त्यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे गायनसेवा अर्पण करता आली नाही. म्हणून किराणा घराण्याचे व पंडित भीमसेन जोशी यांच्या पंडित उपेंद्र भट, पंडित राजेंद्र कंदलगावकर, पंडित सुधाकर चव्हाण, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी व विराज जोशी या पाच गायक शिष्यांनी ‘जमुना के तीर...’ ही भैरवी गाऊन महोत्सवाची सांगता केली. त्यांना भारत कामत (तबला), सुयोग कुंडलगावकर (हार्मोनियम), नामदेव शिंदे, संदीप गुरव (तानपुरा) यांनी साथ दिली.