महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Pune University News

पुण्यातील शैक्षणिक स्तरावरची आंतरराष्ट्रीय ओळख म्हणजे पुणे विद्यापीठ. याच पुणे विद्यापीठाचे नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामांतर झाले. याच विद्यापीठात अनेक परदेशी विद्यार्थी सुद्धा शिकण्यासाठी येतात. त्यामुळे पुणे विद्यापीठ पुण्याची ओळख आहे. त्याच विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे.

pune university
पुणे विद्यापीठ

By

Published : Feb 10, 2023, 9:09 AM IST

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या या विद्यापीठाची ओळख ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी आहे. तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली. त्या घटनेला 10 फेब्रुवारी रोजी 74वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमातून अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.

पुणे विद्यापीठाची स्थापना :बॅरिस्टर मुकुंद जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. 2014 मध्ये पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. गेल्या 74 वर्षांत विद्यापीठाने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाममुद्रा उमटवली आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील 12 जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. 1962 मध्ये त्यातून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठच्या अखत्यारित गेले. इ.स. 1990 मध्ये धुळे व जळगाव यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 46 शैक्षणिक विभाग आहेत. सुमारे सहा लाख विद्यार्थी संख्या आहे.


नामांतराचा प्रवास : इ.स. 2004 साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी पुणे विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 6 जून 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. आणि पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामांतर करण्यात आले.



गुणवत्ता टिकून ठेवली :75 व्या वर्षात पदार्पण करत असताना पुणे विद्यापीठाने सातत्याने आपली गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून ठेवली. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यातील विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपण पुण्यामध्ये येऊन शिक्षण घ्यावे. पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये येतात आणि याच विद्यापीठाच्या पायाभरणीमुळे पुण्याला एक शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळख मिळाली. आज याच शैक्षणिक माहेरी घर असलेल्या पुणे विद्यापीठाचे 75 व्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण होत आहे.



अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभ कार्यक्रम :विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभ कार्यक्रम विद्यापीठाच्या हिरवळीवर संध्याकाळी 4 वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी इदाते हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. कारभारी काळे असणार आहेत. या वेळी प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.


आर्थिक अंदाजपत्रकात विशेष तरतूद : अमृत महोत्सवी वर्षात विविध विषयांवर शैक्षणिक परिषदा, माजी कर्मचाऱ्यांचे संमेलन आदी कार्यक्रम पार पडतील. खास अमृत महोत्सवी वर्षासाठी आर्थिक अंदाजपत्रकात विशेष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. अमृत महोत्सव वर्षासाठी विशेष समिती स्थापन करून अन्य कार्यक्रमांची आखणी पुढील काही दिवसांत केली जाईल. या वर्षात नगर, नाशिक केंद्रांच्या विकासाचा विचार केला जाईल. 75 वर्षानंतरचा विचार करता देशाला आयात कराव्या लागणाऱ्या वस्तुंचे संशोधन, विकास करण्यासारखे प्रकल्प हाती घेतले जातील. त्याशिवाय मराठी भाषा भवनाचे काम अमृत महोत्सवी वर्षात पूर्ण करण्यात येईल.

हेही वाचा :Nana Patole VS Balasaheb Thorat : पटोले - थोरात मतभेदावर रविवारी खलबत; प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details