पुणे - पुण्यातील पर्वती पायथा येथे 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाचा कोयत्याने सपासप वार करत खून केला आहे. रविवारी (13 जून) रात्रीच्या सुमारास ती घटना घडली. सौरभ तानाजी वाघमारे (वय 17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून का बदला खून से, या भावनेतून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दत्तवाडी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोयत्याने सपासप वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा येथे 8 ते 10 आरोपींनी सौरभ वाघमारेला बाहेर बोलावले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या सौरभला तिथेच सोडून आरोपी पसार झाले. त्यानंतर काही वेळातच सौरभचा मृत्यू झाला. दत्तवाडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.