बारामती : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने पालखी रथ व दिंड्यांचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी चौकाचौकात मंडप उभारले :बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले गेले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी नगरपरिषेदेकडून सुविधा :आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई - सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. निर्मल वारी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.