पुणे- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वरांचे संजीवन समाधी सोहळा मंदीर दर्शनासाठी 14 एप्रिलपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, श्रींची नित्यपुजा सुरु रहाणार असून भाविक, वारकऱ्यांसाठी मंदीर प्रवेश बंद राहणार आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी दिली आहे.
दर्शनासाठी14 एप्रिलपर्यंत बंद
महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असणार असे निर्देश दिले. त्यामुळे पूर्वी 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद असलेले संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर आता 14 एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत.
राज्यात कोरोनाचा शिरकाव होत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदीरात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढु नये, यासाठी मंदिर 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. पुढील काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी सोहळा मंदिर दर्शनासाठी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाचा ठराव केला आहे.
हेही वाचा -यावर्षी नेटकऱ्यांना एप्रिल फुल पडणार महागात!