पुणे Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. जुन्या पैशाच्या वादातून आरोपींनी मोहोळची गोळ्या घालून हत्या केल्याचं आता उघड झालं आहे. मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या दहशतीची प्रकरणं समोर येत आहेत. शरद मोहोळची दहशत इतकी होती की, तुरुंगात असताना अभिनेता संजय दत्तलाही मोहोळची भीती वाटत होती. शरद मोहोळ येरवडा कारागृहात असेल, तर मला तिकडं पाठवू नका, असं त्यावेळी संजय दत्तनं म्हटलं होतं, असं सांगितलं जातंय.
मोहोळची संजय दत्तला भीती? :शरद मोहोळच्या जवळच्या एका कार्यकर्त्यानं सांगितलं की, 2012 मध्ये शरद मोहोळ येरवडा तुरुंगात होता. त्यावेळी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मोहोळ हा छोटा राजनसारखा डॉन असल्याचं सांगत होता. त्यामुळं येरवडा तुरुंगात कैद्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्याच दरम्यान अभिनेता संजय दत्तला कथित मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळं संजय दत्तला येरवडा तुरुंगात पाठवण्यात येणार होतं. मात्र, संजय दत्तनं येरवडा कारागृहात जाण्यास नकार दिला होता. येरवाडा तुरुंगात शरद मोहोळ असल्यानं मला तिथं नेऊ नका, असं संजय दत्त म्हणाला होता. त्यानंतर मोहोळला येरवडा कारागृहातून तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. मोहोळ जवळपास 4 वर्षे येरवडा कारागृहात होता. त्यानंतर त्याला जानेवारी 2021 मध्ये जामीन मिळाला होता. दरम्यान, या मुद्द्याला कोणताही अधिकृत आधार नाही. त्यामुळं याची जबाबदारी 'ईटीव्ही भारत' घेत नाही.
कोण होता शरद मोहोळ? : शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा मोहरक्या होता. शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ असून 2007 मध्ये गणेश मारणे टोळीनं संदीप मोहोळची हत्या केली होती. त्यावेळी शरद मोहोळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्यानं मारणे टोळीला संपवण्याची शपथ घेतली होती. 2010 मध्ये शरद मोहोळनं गणेशची हत्या केली होती. त्यानंतर गँगचा म्होरक्या किशोर मारणेची निलयम टॉकीजजवळ हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लवळेगाव सरपंचाचं अपहरण तसंच दरोडा प्रकरणात शरद मोहोळ मुख्य आरोपी होता. त्याला अटक करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. 2012मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीचा खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे डॅान असल्याचं भासवत होता.