पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या 'किल्ले शिवनेरी' संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत किल्ल्यावरील अंबरखाना वास्तूमध्ये सातवाहन आणि शिवकालीन वारसा संग्रहालय उभारावे, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने केली आहे.
शिवनेरी संवर्धन आणि विकास हा प्रकल्प २००३ पासून सुरू आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा जुन्नर वन विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अशोकुमार खडसे यांनी बनवला होता. त्यानुसार या ८६ कोटींच्या आराखड्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. या आराखड्याअंतर्गत किल्ल्यावर विविध संवर्धनाची कामे झाली असून, या विकासकामांमुळे वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार शिवनेरीवर दरवर्षी सुमारे ५ लाख विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या विद्यार्थी, पर्यटक, शिवभक्तांना शिवनेरीसह, सातवाहनकालीन जुन्नर तालुक्याच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी दालन नाही. त्यामुळे किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये सातवाहन आणि शिवकालीन वारसा संग्रहालय उभारावे, अशी मागणी जुन्नरची सह्याद्री गिरीभ्रमण संस्था २००७ पासून राज्य शासनाकडे करत आली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -