पुणे- पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी, भोसरी आणि चिखली परिसरात चोरट्यांनी दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांत तब्बल ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. चोरट्यांकडून मोबाईल दुकाने, गारमेन्टस, गिफ्ट शॉपी, पुणेरी बेकर्स या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या प्रकरणी हिंजवडी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात चोरट्यांचा धूमाकूळ, ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास - चोरट्यांचा धुमाकूळ
हिंजवडी, भोसरी आणि चिखली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांकडून मोबाईल शॉपी, गारमेंन्टस, गिफ्ट शॉपी, पुणेरी बेकर्स यांना टार्गेट. तब्बल ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीतील कुदळवाडी येथील मोबाईल शॉपी दुकानातून ५४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, मेमरी कार्ड, पावर बँक व पाच हजार रुपये तर हिंजवडीतील शिवाजी चौक येथील 'द हिमालया' मोबाईल शॉपी दुकानातील ८ लाख ६९ हजार रुपयांचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तिसऱ्या घटनेत इंद्रायणीनगर येथील लेमन गारमेन्टस, दादासाहेब भाऊराव फुके यांचे पुणेरी बेकर्स आणि सुरेशकुमार मांगेलालजी चौधरी यांचे गिफ्ट शॉपीचे दुकान चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडले. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल ११ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान या घटनेनंतर व्यापाऱ्यांकडून पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.