पुणे- आषाढ महिना आला की वारकऱयांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आणि त्या निमित्ताने आस लागते पंढरपुरच्या पाडुरंगाच्या दर्शनाची...पण वारीत प्रत्यक्ष विठूमाऊलीचं दर्शन घेण्यापूर्वी हे वारकरी आतुरतेने वाट पाहातात ती रिंगण सोहळ्याची. मोठय़ा उत्साहात वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी होतात.
रिंगण सोहळा हा सर्वांच्या आकर्षणाचा मोठा भाग आहे. भजनात परमोच्च आनंद अनुभव करण्याचा क्षण म्हणजे रिंगण. दिंडीतील चालण्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर करण्याचा एक भाग म्हणजे रिंगण.
पालखीमध्ये 'रिंगण' हे विशेष आकर्षण असते. यामध्ये 'गोल रिंगण' आणि उभे रिंगण अशा २ प्रकारचे रिंगण असतात. गोल रिंगणामध्ये पालखी भोवती मानवी साखळी करून फेर धरल्या जातो. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकऱ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वारकर्यांची एकच गर्दी उसळते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.