पुणे: कसबा पोटनिवडणूकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. कसबा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांनी पोलिसांना सोबत घेत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. लोकशाहीची हत्या झाली असे सांगत त्यांनी कसब्यातील गणपती मंदिरासमोर उपोषणाला सुरूवात केली. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर पाच तासांनी त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. भाजप नेत्यांनी रविंद्र धंगेकरांच्या उपोषणावर टीका केली आहे.
धंगेकरांचे उपोषण मागे: उपोषणा दरम्यान रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी गेल्या 30 वर्षापासून माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना संभाळत आहे. माझे कार्यकर्ते हे माझे घर आहे आणि त्यांना जर कोणी त्रास देत असेल तर हे मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, असे यावेळी धंगेकर यांनी सांगितले. सुमारे 5 तास झालेल्या उपोषणा दरम्यान पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर धंगेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
धंगेकरांचे भाजपवर आरोप:महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला की, काल पाच वाजता प्रचार संपला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना मतदार संघ सोडून गावाला जायचे दमदाटी करत असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला होता.