पुणे - राजगुरूनगरमधील राक्षेवाडीत कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी राजगुरूनगर नगरपरिषदचे राक्षेवाडीतील दोन वार्ड कंटेन्मेंट, तर राजगुरूनगर शहर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. तसेच नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी केले आहे.
राजगुरूनगर बफर झोन, राक्षेवाडी कंटेन्मेंट झोन; नागरिकांनी बाहेर न पडण्याचे पोलिसांचे आवाहन राजगुरूनगर परिसरात एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यांच्या जवळच्या संपर्कात ११ जण असून त्यापैकी ५ जण जहांगीर, तर ६ जण औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी, त्यांची २ मुले, कुटुंबातील तीन लहान मुले, भाऊ, वहिनी, आई, वडील सलूनवाला व डॉक्टर यांचा समावेश आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून कुटुंबातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी निमगाव येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते. या कंपनीतील २९ महिलापैकी ५ सहकारी कामगार महिला आणि
त्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या २२ फ्लॅटमधील ८७ जणांना त्यांच्या राहत्या घरी होमक्वारंटाईन केले आहे. संबंधित कंपनी गुरुवारी रात्रीपासून पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. रुग्ण आढळून आल्याने पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडे राक्षेवाडी व नगरपरिषदचे दोन वार्ड हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. तसेच परिसरात कोणत्याही दुकानांना उघडण्यास मनाई आहे. फक्त होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या परिसरातील तीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रांतधिकारी संजय तेली यांनी दिली. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप यावेळी उपस्थित होते.
राजगुरूनगर शहर अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस पूर्ण बंद -
राजगुरूनगर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुढील तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील, तर भाजी बाजारासह अत्यावश्यक सेवांसाठी उद्यापासून सकाळी ७ ते ७ ही वेळ आहे.