"बाबानों.. आता तरी घरात बसा"..वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याने जोडले हात
राजगुरुनगर जवळील चासकमानचा डावा कालवा, वाडारोड, डुम्या डोंगरावर असंख्य नागरिक फिरण्यासाठी सकाळी व सायंकाळी बाहेर पडत आहे.
पुणे- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली जात असताना पोलीस व प्रशासनाकडून लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, अशी विनवनी पोलीस रोजच करत आहेत. मात्र, नागरिकांना कोरोनाची भीती राहिलीच नसल्याने राजगुरुनगर जवळील चासकमानचा डावा कालवा, वाडारोड, डुम्या डोंगरावर असंख्य नागरिक फिरण्यासाठी सकाळी व सायंकाळी बाहेर पडत आहेत. अखेर राजगुरुनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी या लोकांना हात जोडून विनंती केली "बाबानों आता तरी घरात बसा"...
गेल्या एक महिन्यापासून अपुऱ्या पोलीसदलाला घेऊन पोलीस आधिकारी आपल्या कार्यक्षेत्रास कोरोनावर मात करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनी बाहेर पडू नका, असे आवाहन पोटतिडकीने पोलीस आधिकारी करत आहेत. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत नसून मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे राजगुरुनगर परिसरात नागरिकांना कोरोनाची भीती राहिली नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.
नियमित व्यायामाची सवय असणारे राजगुरुनगर परिसरातील नागरिक चासकमानच्या डावा कालवा व डुम्या डोंगर, वाडारोडवरून सकाळी व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी जात असतात. यामध्ये प्रौढ नागरिक व महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे राजगुरुनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी प्रत्येक नागरिकांना हात जोडून बाहेर न पडण्याची विनंती केली.
पोलीस कर्तव्य बजावताना हे असेही पोलिसांचे रुप सध्या पहायला मिळत आहे. पोलीस आपले घर, परिवार सोडून बाहेर राहुन कोरोनावर मात करण्यासाठी कर्तव्य बजावत कोरोनाचे गांभीर्य नागरिकांना पटवून देत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाची भीतीच राहिली नसताना 'बाबानों आता तरी घराबाहेर पडु नका' असं हात जोडुन सांगण्याची वेळ पोलीस आधिकाऱ्यांवर आली आहे.