मान्सूनने महाराष्ट्र व्यापला.. येत्या ५ दिवसांत सर्वत्र पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा - पाऊस न्यूज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या मान्सूननं राज्य व्यापलं आहे. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सून पसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
पुणे - हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या मान्सूननं राज्य व्यापल आहे. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सून पसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर रविवारी पुणे आणि मुंबईतही मान्सून धडकला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि गोव्यात पुढील 5 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. त्याचबरोबर या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115 . 5 मिलिमीटर पावसाच इशारा देण्यात आला आहे. तर 15 ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी 20.4 सेंटीमीटर पावसाचा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात 16 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. 17 आणि 18 तारखेला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात आज (रविवार) सर्वदूर पाऊस पडेल मात्र, सोमवारपासून पाऊस थोडासा कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 17 आणि 18 तारखेला पाऊस कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
त्याचबरोबर विदर्भातही सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. 16 तारखेला अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र, सतरा-अठरा तारखेला पाऊस कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 5 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पंधरा ते सोळा तारखेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.